आतुरता गुढीपाडव्याची । शोभायात्रा अलिबागकरांची

। अलिबाग । सिद्धी भगत ।
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नविन उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
अलिबागमध्येसुद्धा दरवर्षी गुढीपाडवा सणानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. या शोभायात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु गेली दोन वर्षे जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या सावटामुळे अनेक सणांवर कोरोना काळात बंदी घालण्यात आली होती. अनेकजणांनी या काळात आपले जीव गमावले त्याचबरोबर भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला परंतु आता सरकारने सणांवरील निर्बंध उठवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला असून नागरीकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.
मराठी नववर्षाचा आनंद द्विगुणीत कराण्यासाठी दोन वर्षांनंतर यंदा अलिबागमध्ये शोभायात्रेचे आयेजन करण्यात आले आहे. यासाठी जोरदार तयारीसुद्धा सुरू झाली आहे. ढोलताश पथकांसोबतच वेगवेगळ्या वेशभुषा परीधान केलेला आगळावेगळा चित्ररथही यंदा आयोजित करण्यात आला आहे. लाईव्ह रांगोळीचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पारंपारिक नृत्यही आयेजित केले आहे. अलिबागकर एकत्र येऊन हा सण कोरोना मुक्त व अनंदात साजरा करणार असल्याचे एकंदरीत दृश्य दिसत आहे.

शोभायात्रेची रूपरेषा
साडेतीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर आयेजित करण्यात आलेली शोभायात्रा राम मंदिरापासून सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या शोभायात्रेची सांगता होणार आहे. त्याआधी राम मंदीरात सकाळी गुढी उभारून त्याचे पुजन करण्यात येणार आहे. ही शोभायात्रा सकाळी आठ वाजता राम मंदिरापासुन सुरू होणार असून महावीर चौक ते रायगड बाजार व त्यानंतर ठीकरुळ नाका ते शिवलकर नाक्याहून मुख्य बाजारातून ही शोभायात्रा जैन मंदीराजवळ येणार आहे. तसेच अमोल कापसे यांच्या नमन नृत्य संस्थेतर्फे चित्ररथात नृत्य सादरीकरण होणार आहे. त्यानंतर मारुती नाका ते बालाजी नाका व अखेरीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या शोभायात्रेची सांगता हेणार आहे. या ठिकाणी लाईव्ह रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध रांगोळीकार हे आपली लाईव्ह रांगोळीची कला अलिबागकरांसमोर सादर करणार आहेत. व फडके बुवा यांच्या किर्तनाने शोभयात्रेची सांगता होणार आहे.

नमन नृत्य संस्थेचे अनोखे सादरीकरण
गुढीपाडव्यानिमित्त अलिबागमधील सर्व कलाकार एकत्र येऊन या शोभायात्रेत नमन नृत्य संस्थेतर्फे एक अनोखे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेेत. नृत्य व नाटक या कार्यक्रमांची तयारी एक महीना आधीपासुनच सुरु झाली असून नमन नृत्य संस्थेतर्फे सादर करण्यात येणार्‍या चित्ररथीय नृत्यातून सर्व कलाकार समाजप्रबोधनपर विषय सादर करणार आहते. तसेच या शोभयात्रेसाठी अलिबागचे सर्वच कलाकार उत्सुक आहेत तरी सर्व अलिबागकरांनी या शोभायात्रेत सहभाग घ्यावा व आनंद लुटावा असे आवाहन नमन नृत्य संस्थेमार्फत करण्यात आले आहे.


कोव्हिड दरम्यान सगळच बंद होत. सणांवरसुद्धा निर्बंध घालण्यात आले होते. परंतु दोन वर्षानंतर पुन्हा गुढीपाडव्या निमित्त शोभयात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुलांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. पथकाची तयारी 15 ते 20 दिवसांआधीच सुरू झालेली आहे. बर्‍याच नवीन महिला व लहान मुलांनी ढोलताशा पथकात सहभाग घेतला आहे. सर्वांनाच या सणाची व शोभयात्रेची उत्सुकता लागुन राहीली आहे. – दिलीप नावरे, अध्यक्ष कुलाबा ढोलताशा पथक

कोव्हीडमुळे गेली दोन वर्ष या कार्यक्रमामध्ये खंड पडला परंतु आता सर्वकाही सुरळीत सुरू झाले आहे. या शोभायात्रेतून जनतेला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे तसेच हा सण अलिबागकरांच्या आनंदासाठी साजरा करावा व समाजात एकोपा टिकुन राहावा त्याचबरोबर मराठी मातीची पारंपारिकता अलिबागकरांनी जपावी, नवीन मुलांसाठी आपल्या परंपरेची ओळख व्हावी व अलिबागकरांनी हिंदु नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करावे हा या शोभायात्रेमागील हेतू आहे. – सुनिल दामले, कार्यकर्ते


Exit mobile version