अलिबागमध्ये अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन

जिल्हा परिषदेमार्फत माझी लाडकी बहिण योजनेची जनजागृती सुरु

| अलिबाग | प्रतिनिधी |

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्यावतीने चेंढरे ग्रामपंचायतीच्या सभागृहात मंगळवारी (दि.02) अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 या योजनेसंदर्भात जनजागृतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत योजनेच्या परिपत्रकाचे वाचन करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे योजनेच्या परिपत्रकाची माहिती देत मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, प्रकल्प अधिकारी गितांजली पाटील, विस्तार अधिकारी विजय मयेकर, जिल्हा महिला बालविकास पर्यावेक्षिका अधिकारी साळुंखे, पर्यवेक्षिका विनोदीनी मोकल, सामिया पेरेकर, दीप्ती मोकल, कल्पिता साळगावकर आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे महत्व, उद्देश, लाभार्थी, योजनेच्या पात्रतेच्या अटी, निकष, आवश्यक कागदपत्र, पात्र व अपात्रतेचे निकष, आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेबाबतच्या येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय, पर्याय आदी विविध विषयांवरील सखोल मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी गितांजली पाटील यांनी सांगितले की, योजना राबवित असताना अंगणवाडी सेविकेवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी सतर्क असणे आवश्यक आहे. तर, आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी घेतली पाहिजे. यावेळी पर्यवेक्षिका सामिया परेकर यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिविता पाटील यांनी तर आभार प्रकल्प अधिकारी गितांजली पाटील यांनी व्यक्त केले.

Exit mobile version