कीड रोग प्रादुर्भावाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

। उरण । वार्ताहर ।

सध्या पावसाच्या प्रमाणात खंड पडत असल्यामुळे करपा, कडकरपा, खोडकिडा व पानं गुंडाळणार्‍या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे चानजे तालुका उरण येथे क्रॉपसॅप अंतर्गत कीड व रोग सर्वेक्षण प्रकल्प अंतर्गत नुकतेच कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील शास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत यांनी, मौजे चांजे येथे क्षेत्रीय भेटीचे आयोजन केले. चाणजे येथील आशा म्हात्रे, भारती म्हात्रे, रजनी घरत यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन, त्यांना व लगतच्या शेतकर्‍यांना कीड रोगाचा प्रादुर्भाव कसा व कुठे होतो तसेच, कोणत्या प्रमाणात होतो व तो कसा ओळखावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

काही ठिकाणी शेतात उंदराचे प्रमाण वाढत असल्याने भात पिकाचे पाने कुरतडून नुकसान झाल्याचे दिसून आले, तसेच त्यांनी कीड व रोगाबाबत उपाययोजना कोणत्या कराव्यात, खत व्यवस्थापन कसे करावे व किड नियंत्रणासाठी शेतात पक्षी थांबे उभे करण्याविषयी माहिती दिली.

क्रॉपसॅप कीड व रोग सर्वेक्षण अंतर्गत नियमितपणे ऑनलाइन सर्वेक्षण केले जाते त्याप्रमाणे शेतकर्‍यांना कीड व रोगाची एडवाईजरी व्हाट्सअप ग्रुप व भित्तिपत्रके या मार्फत दिली जाते तसेच दापोली विद्यापीठातून येणार एस एम एस शेतकर्‍यांना देण्यात येतात. भेटीच्या वेळी कर्जत कृषी संशोधन केंद्र येथील कीड व रोग शास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथील तंत्र अधिकारी तनुजा घाडगे, कृषी पर्यवेक्षक सुरवसे, उरण तालुका कृषी पर्यवेक्षक बाळकृष्ण धेंडे, अलका बुरकुल व चानजे कृषी सहाय्यक श्रीम ए एस पानसरे तसेच महिला शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version