| भुवनेश्वर | वृत्तसंस्था |
गुजरात जायंट्स संघाने शनिवारी रात्री झालेल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेच्या अजिंक्यपदाच्या लढतीत चेन्नई क्विक गन्स संघावर दणदणीत विजय मिळवत झळाळता करंडक पटकावला. अंतिम सामन्यात सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून प्रतीक वाईकर, सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू म्हणून आदित्य गणपुले आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून रामजी कश्यप याची निवड करण्यात आली.
गुजरातने चेन्नईवर 31-26 (मध्यंतर 19-7) असा 5 गुणांनी विजय साजरा केला. गुजरातच्या दीपक माधव (2.54 मि. संरक्षण), पबनी साबर (नाबाद 1.54 मि. संरक्षण), शुभम थोरात (1.26 मि. संरक्षण व 2 गुण), संकेत कदम (नाबाद 1.42 मि. संरक्षण व 6 गुण), सुयश गरगटे, पी. नरसय्या (प्रत्येकी 4-4 गुण) यांनी केलेली कामगिरी मोलाची ठरली.
तसेच गुजरातने ड्रीम रन्सचे 7 गुण मिळवले व तेच त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. चेन्नईच्या लक्ष्मण गवस (2.54 मि. संरक्षण व 2 गुण), रामजी कश्यप (1.28, नाबाद 1.50 मि. संरक्षण व 4 गुण), विजय शिंदे (1.17, 1.57 मि. संरक्षण), आदर्श मोहिते (1.46 मि. संरक्षण), अमित पाटील (1.22 मि. संरक्षण), सुरज लांडे, आकाश कदम (प्रत्येकी 6-6 गुण) यांनी शर्थीची लढत दिली.