हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
| मुंबई | प्रतिनिधी |
गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. गतविजेत्यांनी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजयाची नोंद केली. शुबमन गिलच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमी आणि मोहित शर्माच्या वेगवान माऱ्यापुढे हैदराबादच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. दोघांनी प्रत्येकी चार बळी टिपत हैदराबादचा डाव गुंडाळला. त्यामुळे या स्पर्धेतील हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले आहे.
शुबमन गिलच्या शतकी खेळीनंतरही गुजरातला सन्मानजनक धावसंख्या उभारता आल्या नाही. त्याने 58 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 101 धावा केल्या. साई सुदर्शनने 47 धावा करताना शुबमनसह दुसऱ्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. पण, सुदर्शन बाद झाल्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजानी डोकं वर काढलं. भुवनेश्वर कुमारने 20व्या षटकात तीन बळी घेत चार षटकात 30 धावा देत पाच गडी बाद करण्याची किमया केली. गुजरातला त्यांनी 9 बाद 188 धावांवर रोखले.
शुबमनच्या फटकेबाजीनंतर मोहम्मद शमीने चेंडू वळवला अन् पॉवर प्लेमध्ये 17 धावांत 3 बळी घेत हैदराबादचा बाजार उठवला. रिंकू सिंगने केलेल्या धुलाईनंतर कमबॅक करणाऱ्या यश दयाल व मोहित शर्मा यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेत हैदराबादचा निम्मा संघ 45 धावांत तंबूत पाठवला. अनमोलप्रीत सिंग (5), अभिषेक शर्मा (5), कर्णधार एडन मार्कराम (10), राहुल त्रिपाठी (1) आणि सनवीर सिंग (7) हे माघारी परतले. मोहितने पहिल्याच षटकात दुसरा बळी घेताना अब्दुल समदला (4) बाद केले आणि नवव्या षटकात मोहितने आणखी एक बळी घेत मार्को यान्सेनला (3) माघारी पाठवले.
हेनरिच क्लासेनने 35 चेंडूंत अर्धशतक झळकावताना भुवनेश्वर कुमारसह खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. शमीने 68 धावांची भागीदारी करणारी जोडी तोडली. क्लासेन 44 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 64 धावांवर झेलबाद झाला. भुवी 27 धावांवर झेलबाद झाला. नूर अहमदला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले आणि तेवातियाने 20वे षटक फेकले. हैदराबादल 9 बाद 154 धावा करता आल्या. गुजरातने हा सामना 34 धावांनी जिंकला.