चेन्नई सुपर किंग्सवर पाच गडी राखून मात
| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने चेन्नईविरुद्धची आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली. सीएसकेवरचा हा त्याचा सलग तिसरा विजय आहे. राशिद खानला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 178 धावा केल्या होत्या. हे आव्हान गुजरातने 19.2 षटकांत 5 विकेट्स गमावत 182 धावा करून पूर्ण केले. गुजरात टायटन्सने साई सुदर्शनला त्यांचा पहिला इम्पॅक्ट प्लेअर बनवले. केन विल्यमसनची जागा सुदर्शनने घेतली. त्याचा फायदा करत त्याने शुबमनसोबत शानदार अर्धशतकी भागीदारी केली. त्याने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. त्याला राजवर्धन हांगरगेकरने साई सुदर्शनला यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले.
गतविजेत्या गुजरात टायटन्सने सांघिक खेळ करताना इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. शुबमन गिलच्या अर्धशतकाला इम्पॅक्ट खेळाडू साई सुदर्शन व विजय शंकर यांची साथ मिळाली. राशीद खानने मॅजिकल खेळी करून मॅच फिरवली. शुबमन गिलने 12व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. मिचेल सँटनरच्या दुसर्या चेंडूवर सिंगल घेत त्याने 50 धावांचा टप्पा गाठला. शुबमन गिल 31 चेंडूत 51 आणि कर्णधार हार्दिक पांड्या 11 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. जडेजाने अफलातून चेंडूवर त्याला त्रिफळाचीत केले. राजवर्धन हांगरगेकरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळाले.
दरम्यान चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. मोईन अलीने 23 धावांची खेळी केली, तर धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या सात बाद 178 पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. जोशुआ लिटलने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.