गतविजेत्या डिंगवर सनसनाटी विजय
। सिंगापूर । वृत्तसंस्था ।
डी. गुकेश याने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीतील 11व्या फेरीत सनसनाटी विजयाची नोंद केली आहे. या विजयासह त्याने पहिल्यांदाच आघाडी मिळवली आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीतील तीन फेर्या शिल्लक असून, गुकेश सहा गुणांसह आघाडीवर आहे. गतविजेता चीनचा डिंग लिरेन याच्याकडे पाच गुण आहेत.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीतील 11वा डाव रिव्हर्स्ड ब्लुमेन्फेल्ड ओपनिंगने सुरू झाला. यावेळी गुकेशने डिंगच्या फ्रेंच बचावाचा सामना करणे टाळले. डिंगला हे ओपनिंग अनपेक्षित असावे. कारण त्याने पहिल्या पाच खेळी करायला 50 मिनिटे घेतली होती. यानंतर वेळ भरून काढण्यासाठी त्याने पटापट खेळी करायला सुरुवात केली तेव्हा गुकेशचा विश्वविजेतेपदाच्या लढतीतील अनुभव दिसून आला. स्वतःकडे भरपूर वेळ असताना त्यानेही जरूर नसताना पटापट खेळी केल्या. त्यामुळे त्याच्या हातून वजिराच्या बाजूचे एक प्यादे पुढे ढकलण्याची घोडचूक झाली. परिस्थिती सावरण्यासाठी गुकेशनेही 50 मिनिटे विचार केला. दोन्ही खेळाडू वेळेच्या दबावाखाली आले. त्यांच्या हातून सर्वोत्कृष्ट खेळी झाल्या नाहीत. गुकेशने स्वतःला सावरत वजिराच्या बाजूचे प्यादे पुढे ढकलले आणि एक प्यादे देऊन आपले सर्व मोहरे आक्रमक ठिकाणी आणून ठेवले.
डिंगने बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्याने गुकेशची एक चाल बघितली नाही आणि एक मोहरा गमावला. डिंगने लगेचच आपला पराभव मान्य केला. या विजयामुळे गुकेशने एक दमदार पाऊल विश्वविजेतेपदाकडे टाकले आहे. डिंगचा प्रत्येक डाव बरोबरीत सोडवून टाय ब्रेकमध्ये जाण्याचा मनसुबा गुकेश फोल ठरविणार असे वाटत आहे. अर्थात गेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत रशियन खेळाडू नेपोमिनीआची विरुद्ध मागे पडल्यावर डिंगने लगेच पुढचा डाव जिंकून लढतीत बरोबरी साधली होती. तसे त्याला पुन्हा करू न देण्याची किमया गुकेशने आता उरलेल्या तीन डावांत करण्याची शक्यता आहे. उरलेल्या तीनही डावांत जरी बरोबरी झाली तरी गुकेश ही लढत आरामात जिंकेल. तीनपैकी दोन डावांत पांढर्या मोहर्या घेऊन खेळताना डिंग जिंकायची पराकाष्ठा करणार हे निश्चितच आहे. सध्या तरी लढतीचे पारडे स्वतःच्या बाजूने झुकविण्यात गुकेशला यश मिळाले आहे.