| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी अब्दुल रऊफ मर्चंट (60) याचा गुरुवारी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाच्यावतीनं देण्यात आली आहे. रऊफ मर्चंटची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. 30 डिसेंबर रोजी त्याला सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यानं घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानं 4 जानेवारीला त्याला पुन्हा कारागृहात आणलं गेलं. मात्र, गुरुवारी सकाळी पुन्हा त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं तातडीनं घाटी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती हर्सूल कारागृह अधीक्षक खामकर यांनी दिली आहे. मुंबईत 12 ऑगस्ट 1997 रोजी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व आणि टी सिरीज या म्युझिक कंपनीचे मालक गुलशन कुमार यांची एका मंदिराबाहेर क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत गुन्ह्यात अटक केलेल्या मर्चंटला 2002 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 2003 मध्ये त्याची रवानगी येरवडा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.






