दिघी सागरी पोलिसांची कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाघाच्या नखासह बंदूक व काडतूस बेकायदेशीररित्या ठेवणाऱ्यांवर दिघी सागरी पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपींपैकी एकजण अल्पवयीन असून, दुसरा 34 वर्षीय आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील वाकळघर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मराठी शाळेजवळ काही मंडळींकडे बंदूक, जिवंत काडतूस आणि वाघाची नखे असल्याची माहिती दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांना मिळाली. त्यांनी पडताळणी केल्यावर पथक तयार केले. 27 जूून रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी त्यांना मुद्देमाल दिसून आला. तो सर्व पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून, दुसरा आरोपी अभिषेक गुजर (34) आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. माणगावमधील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे करीत आहेत.