चौल दत्तमंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव

दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्टकडून होणार प्रसादाचे वाटप

| चौल | प्रतिनिधी |

चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरात रविवारी (दि. 21) गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट, अलिबाग या संस्थेच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दत्त टेकडीवरील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये करण्यात आले असून, येणार्‍या भाविकांना प्रसाद आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट, अलिबागचे संस्थापक अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अन्नदान आणि प्रसादाच्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. श्री. मोरे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून दत्तमंदिरात पायी पालखी परिक्रमा उत्सव, दर गुरुवारी अन्नदान, पंढरपूर, गाणगापूर, गोंदिवलेकर महाराजांच्या पावनभूमीत अन्नदान करण्यात आले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अन्नदानाचा घेतलेला वसा असाच अखंडित सुरु राहणार असून, हे पुण्याचे काम आम्ही करीतच राहणार आहोत, अशी ग्वाही महेश मोरे यांनी दिली.

दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या दिवशी चौल दत्त टेकडीवरील श्री स्वामी समर्थांच्या मठात अन्नछत्र ट्रस्टच्या माध्यमातून रविवारी पहाटे पाच ते रात्रौ 11 वाजेपर्यंत प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून, दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शेकडो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात, अशी माहिती श्री. मोरे यांनी दिली. तरी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी च्या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्नछत्र ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे अध्यक्ष सागर कुंड व अन्य सदस्य मेहनत घेत आहेत.

Exit mobile version