जिल्हाभरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

शाळा-महाविद्यालयांमध्येही कार्यक्रम साजरे

| रायगड | प्रतिनिधी |

गुरुप्रतिमा, पादुकांचे पूजन, भक्तीगीते, भजन, गुरुचे महत्त्व सांगणारी प्रवचने अशा विविध उपक्रमांतून जिल्हाभरात रविवारी (दि. 21) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौणिमेनिमित्त जिल्ह्यातील मंदिरे, मठ रंगीबेरंगी फुले आणि रोषणाईने सजविण्यात आले होते. भाविकांनी सकाळीच मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. प्रमुख मंदिरे आणि मठांमध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ होती. सुट्टीचा दिवस असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्येही आदल्यादिवशी म्हणजे शनिवारी गुरुपौणिमेचा साजरी केली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात गुरुचे असणारे महत्त्व पटवून दिले.

हिरवळ महाविद्यालयात गुरूपौर्णिमा साजरी
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स (सीएसआयटी) महाडमध्ये विद्यार्थी कौन्सिल विभागामार्फत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्रा. सुदेश कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुश्दा झाटम या विद्यार्थिनीने केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी कृतज्ञता आणि आदर म्हणून महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहा मळेकर या विद्यार्थिनीने शिक्षकांप्रती कविता सादर करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आयेशा अन्वरे, सोलिहा मोमीन आणि अल्फिया बागवान यांनी शिष्याच्या आयुष्यात असणारे गुरूचे स्थान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.


विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर सहा. प्राध्यापिका नगीना खल्फे यांनी आपल्या गुरूंचा सन्मान करण्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करून गुरुपौर्णिमेविषयी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. सुदेश कदम यांनी गुरु-शिष्य संबंधांवर आपले विचार मांडले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया, संचालिका सोनाली धारिया यांनीही शिक्षकांप्रती आदराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करून सर्व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी यांनी आदर, कृतज्ञता आणि ज्ञानाचा पाठपुरावा या मूल्यांना बळ देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करणार्‍या सर्व गुरुंप्रती मनापासून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुश्दा झाटम या विद्यार्थिनीने केले.

कर्जत एज्युकेशन सोसायटीमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा. आपल्या संस्कृतीचे जतन करत काळासोबत शिक्षणाचा ध्यास घेऊन सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या कर्जत एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेच्या कर्जत व कडाव या शाळेत गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.

संस्थेच्या कर्जत शाळेत सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रात गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून मृदुल गडणीस उपस्थित होत्या. संस्थेचे सदस्य सतीश पिंपरे यांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी यांनी गडणीस यांचे स्वागत केले, तसेच दुपारच्या सत्रात संस्थेचे सदस्य राजेश भुतकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्या म्हणून वृषाली वैद्य यांचे स्वागत करण्यात आला. संस्थेच्या कडाव येथील शाळेतही गुरूपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका यांनी संस्थेचे सदस्य सतीश पिंपरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत गुरूपौर्णिमा साजरी केली.

पनवेलमधील गावदेवी मंदिरच्या बाजूला असलेला स्वामी समर्थ मठामध्ये भक्तांची दर्शनासाठी झालेली गर्दी.

पनवेलमधील साई संस्थानच्या मंदिरात साईंच्या दर्शनासाठी झालेली गर्दी.

बोर्लीपंचतनमध्ये अखंड नामस्मरण


श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील दक्षिण सिम्मर ज्ञान मंदिर येथे ब्रह्मलीन सद्गुरु भगवान परमपूज्य श्री जगजीवन बापूंच्या ज्ञानमंदिरामध्ये गुजराती समाजाकडून सकाळी 10 वाजता सद्गुरुंचे पूजन तसेच नामस्मरण भजन आणि रास गरबा करत हा उत्सव पार पडला. दरम्यान, पूजन आणि भजन, दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी सद्गुरुंच्या सभामंडपामध्ये रास गरबा करण्यात आला.

स्वामी समर्थ सेवा केंद्रात उत्सव

दरवर्षीप्रमाणे यंदाही चौक येथील दिघे वाडा येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा येथील मठाधिपती जयवंत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती, स्वामी याग, होमहवन, पाद्यपूजन करून सायंकाळची आरती, भजन, प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे दत्त मंदिर कोल्हापूर पेठ, हनुमान मंदिर तारापूर येथे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तुपगाव येथील स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये गरजूंसाठी आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात दोनशेहून अधिक गरजूंनी लाभ घेतला.

Exit mobile version