गुरुजींचे ग्रामविकासमंत्र्यांना गार्‍हाणे

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्‍नांकडे वेधले लक्ष
शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यातील प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने पुढाकार घेतला आहे. शिक्षक परिषदेचे नेते आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि हे प्रश्‍न तातडीने सोडवावेत, असे साकडे घातले.

राज्यातील शिक्षकांना वैद्यकीय बिले घेण्यासाठी ज्या अडचणी येतात. वैद्यकीय बिल मंजूर करण्यात शिक्षकांना जिल्हा परिषद, विभागीय कार्यालय, आणि मंत्रालय स्तरावर अनेक फेर्‍या माराव्या लागतात. नाहक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बिले मंजूर होऊन निधीअभावी पैसे मिळत नाहीत. या सर्व त्रासातून सुटका होण्यासाठी शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करणे व त्याची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यांत करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

शिक्षकांना आश्‍वासित प्रगती योजना 10:20:30 लागू करण्यासंदर्भात चर्चा झाली. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक वगळून सर्व विभातील शासकीय कर्मचार्‍यांना आश्‍वासित प्रगत योजना लागू करण्यात आली आहे. निवड श्रेणीचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी व कपात केलेले घर भाडे त्यांना पुन्हा परत करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्‍वासन देण्यात आले. एमएससीआयटी अंतर्गत ज्या सेवानिवृत्त शिक्षकांची रक्कम जमा केलेली आहे ती त्यांना परत मिळावी व एमएससीआयटीला मुदतवाढ देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2023 जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले गुरुजी, कार्याध्यक्ष भरत मडके, संपर्क मंत्री राजेंद्र नांद्रे, रत्नागिरी जिल्हा शिक्षक नेते बळीराम मोरे, सुशील वाघमारे, संदेश पालकर, विनायक ठुबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version