| रसायनी | प्रतिनिधी |
गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या 10 गौरवशाली वर्षपूर्तीनिमित्त आयोजित जीटीए कप 2026 क्योरुगी आणि पुमसे चॅम्पियनशिप स्पर्धा वारकरी भवन, सीबीडी बेलापूर येथे उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नेरुळ, कोपरखैरणे, पनवेल, नवीन पनवेल आणि उलवे या अकॅडमीच्या पाचही प्रशिक्षण केंद्रांतील 125हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या तायक्वांदो कौशल्याचे दमदार प्रदर्शन केले.
अकॅडमीच्या नवीन 100 ब्रँडेड मॅट्स आणि अत्याधुनिक सेन्सर प्रणालीवर ही स्पर्धा घेण्यात आल्याने स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी यंत्रणा उपलब्ध असलेल्या भारतातील मोजक्या तायक्वांदो अकॅडमींपैकी गुरुकुल तायक्वांदो अकॅडमी एक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. क्योरुगी आणि पुमसे या दोन्ही प्रकारांत विविध वयोगटातील खेळाडूंनी शिस्त, आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि क्रीडाभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडविले. स्पर्धेचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पंच, आशियाई पुरस्कार विजेते आणि अकॅडमीचे संस्थापक तुषार सिनलकर यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम केले. तर राष्ट्रीय पंच व मुख्य प्रशिक्षक रोहित सिनलकर यांनी नियोजन समितीचे नेतृत्व करत स्पर्धेचे काटेकोर नियोजन व दिमाखदार आयोजन केले. या कार्यक्रमाला तेरणा विद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिसा पटेल, ॲड. सुरेखा भुजबळ, ग्लोरी शिप मॅनेजमेंटचे राजेश शाही तसेच अकॅडमीचे संचालक तानाजी सिनलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कोमल झेंडे आणि रेणुका शुक्ला यांनी केले.स्पर्धेच्या सांगता समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू तसेच पंचांचा विशेष गौरव करण्यात आला.
गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा
