। पेण । प्रतिनिधी ।
पेण एज्यूकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात सोमवारी (दि. 22) इतिहास विभागातर्फे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती आदरभाव, जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सदानंद धारप, कला विभाग आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ. यु. ए. खाडिलकर, डॉ. टी. डी. माळवे, समन्वयक प्रा. बी. एम. शिकारे, विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांनी उपस्थित गुरूजनांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात गुरुपौर्णिमा या दिवसाला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व असल्याचे सांगत संत ज्ञानेश्वरांपासुन ते स्वामी विवेकानंदांपर्यंत गुरू-शिष्यांच्या उज्वल परंपरेचा इतिहास अधोरेखित करत जो जो जयाचा घेतला गुण, तोम्या गुरू केला जाण या उक्तीला अनुसरत आपल्या सान्निध्यात येणार्या प्रत्येकाकडून आपण शिकत राहावे आणि स्वत:ला उन्नत करावे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कला विभाग आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ. यु. ए. खाडिलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन याहीपेक्षा तत्त्वांचे पूजन व पालन यांना वैदिक परंपरेत महत्त्व असल्याचे सांगून प्रत्येकाने स्वत:च्या अंतर्यामी असणार्या गुरू तत्त्वाचा अंगिकार करून अखंड शिकत राहून अज्ञानाच्या अंध:कारातुन ज्ञानाच्या तेजाकडे वाटचाल करावी, असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून गुरूजनांप्रती आपला आदरभाव व्यक्त केला.
नेने महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचा जल्लोष
