गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असणार्‍या अलिबाग तालुक्यातील श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान पेझारी यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे सन्मान पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. रविवार 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता अलिबाग तालुक्यातील श्रीदत्त मंदिर सभागृह पेझारी येथे गुरुवर्य सुभानराव राणे यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित गुरूवर्य सुभानराव राणे सन्मान सोहळ्यात परमपूज्य रंजन पंतबाळेकुंद्री यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. शनिवार 1 एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील सन्मान पुरस्कार्थींच्या नावांची घोषणा श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी केली आहे.

या सन्मान सोहळ्यात रविंद्र थळे, राजेंद्र राऊत (शैक्षणिक क्षेत्र), जय पाटील, गौरव डिंगणकर, संयुक्ता हुजरे (राजपथावरील प्रजासत्ताक परेडमधील सहभागी विद्यार्थी), साईराज म्हात्रे, जान्हवी पाटील (विज्ञान प्रदर्शन), सचिन म्हात्रे, निशिकांत पाटील (उद्योग क्षेत्र), दिपक पाटील, सुधीर नाझरे, प्रफुल्ल पवार (पत्रकारिता क्षेत्र), सुनिता पाटील (आरोग्य क्षेत्र), मुकेश नाईक, गार्गी ठाकूर (नाट्यक्षेत्र), तुषार पाटील (क्रीडाक्षेत्र), डॉ. ओंकार किंजवडेकर व सायकल क्लब अलिबाग (पर्यावरण क्षेत्र), राजन पंतबाळेकुंद्री, डॉ.संजय पंतबाळेकुंद्री, सुहास सातोस्कर, संजय राव, दिनेश सुर्वे, रविंद्र नाईक, रघुनाथ पाटील, रमेश कुलकर्णी या सर्वांना अध्यात्मिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, गुरूवर्य सुभानराव राणे यांच्या नावाने दिला जाणारा गुरूवर्य सुभानराव राणे सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार यंदा श्रीपंतवाडी गोहे, ता. खालापूर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या सन्मान सोहळ्यासाठी खा. अरविंद सावंत, माजी आ. पंडितशेठ पाटील, माजी जि.प अध्यक्ष आस्वाद पाटील, भावना पाटील, चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील, सुमना पाटील, सवाई पाटील, महादेव शहाबाजकर, पंडित अरूण कारेकर, राजन पंतबाळेकुंद्री, डॉ.संजय पंतबाळेकुंद्री, अभिजित पंतबाळेकुंद्री, सखाराम पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version