| अलिबाग | वार्ताहर |
थोर संतश्रेष्ठ सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत सांप्रदायाचा रायगड जिल्ह्यात प्रचार आणि प्रसार करणारे गुरुवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांची 42 वी पुण्यतिथी अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे शनिवारी संपन्न झाली. सकाळी श्रींची पूजा व अभिषेक, दत्तात्रेय सहस्त्रनामावली, प्रेमध्वजारोहण असे कार्यक्रम संपन्न झाले. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पेझारी येथील राजाराम पाटील, शशिकांत पाटील, वाघोडे येथील डॉ. रवींद्र राऊत यांचा विशेष सन्मान ज्येष्ठ पंतभक्त शंकरराव म्हात्रे व गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांच्या उपस्तिथीत करण्यात आला. यावेळी विविध पंतभक्तांनी भजनसेवा सादर केली. भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकार यांची दरवर्षीप्रमाणे भजनसेवा संपन्न झाली. यावेळी रायगड जिल्ह्यातील विविध पंतभक्त या कार्यक्रमास उपस्थित होते. सायंकाळी डॉ. संजय भगत यांचे श्रीदत्त प्रेमलहरीतील गुरु माझा जिवीचा जीवन या पदावर सुश्राव्य कीर्तनसेवा संपन्न झाली. शेवटी आरती अवधूताने या पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली.