ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
राज्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाकडून काही नियम देखील घालून दिले आहेत. यात पानटपरीवर, पान मसाला, गुटखा विक्रीस बंदी तर नागरिकांना देखील सार्वजनिक ठिकाणी थुकंण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः सुधागड तालुक्यातील पाली, परळी, पेडली, जांभूळपाडा, लगतच्या सर्वच परिसरामध्ये गुटखा खुलेआमपणे उपलब्ध होत आहे.
ग्रामीण भागामध्ये किराणा दुकानांमध्ये देखील गुटका सहजपणे उपलब्ध होत आहे. या खुलेआम गुटखा विक्री धंद्यावर प्रशासनाची वचक नसल्याचे दिसते. अन्न प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात नसल्याची देखील चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गुटखा बंदी केवळ नावापुरतेच उरले आहे. कधीतरी अन्न प्रशासन व पोलीस कारवाई केली की दोन दिवसानंतर पुन्हा जैसे थे तशी स्थिती होते. या अवैध गुटका विक्री करणार्‍यांवर कडक शासन व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version