| म्हसळा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक व विक्री करण्यावर म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कहाले यांच्या नेतृत्वाखाली उप पोलीस निरीक्षक एडवळे आणि पथकाने कारवाई करून कौतुकास्पद काम केले आहे. त्यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे शहरात गुटखा वाहतूक व विक्री तूर्तास बंद झाली असली तरी ऑनलाईन मटक्याने मात्र डोके वर काढले आहे. श्रीवर्धन शहरात छुप्या पद्धतीने मटका सुरू असल्याची चर्चा होत आहे. म्हसळा येथे कल्याण आणि मेन बाजार मटका व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने मटका खेळणारे लोक मोबाईलवर आकडे व रक्कम पाठवून, तर काही जण कागदावर आकडे उतरवून छुप्या पद्धतीने व्यवसाय करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात अवैध व्यवसाय करताना कोणी सापडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आव्हान म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाले यांनी केले होते. तरीही कल्याण आणि मेन बाजार मटका बंद दाराआड सुरू असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.







