श्रीवर्धनमध्ये पुन्हा गुटखा विक्री?

Oplus_17170466

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन येथे ऑगस्ट महिन्यात 98 हजार रूपयांचा गुटखा श्रीवर्धन पोलीसांनी जप्त केला होता. त्यामुळे गेले तीन महिने गुटखा माफियांनी श्रीवर्धन तालुक्यात गुटखा वितरण थांबवले होते. परंतु, पुन्हा गुटख्याचे वितरण सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र शासनाने तंबाखू, निकोटीन आणि मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू उत्पादनांवर बंदी घातली आहे. श्रीवर्धन शहर व संपूर्ण तालुक्यातील निवडक टोबॅको दुकाने व टपरीवर सर्रास गुटखा विक्री सुरू होती. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात अन्न व औषध प्रशासन आणि श्रीवर्धन पोलीसांनी संयुक्त कारवाई करत काही टपऱ्यांवर धाड टाकीत मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी श्रीवर्धन पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका गुटखा वितरकाच्या चारचाकीची झडती घेतली असता गुटख्याच्या पिशव्या मिळाल्या होत्या. या कारवाई नंतर काही महिने गुटखा माफियानी वितरण थांबवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गुटखा विक्री पुन्हा तेजीत सुरू झाली आहे.

गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. गोपनीय माहिती काढून कारवाई करत आहोत. नागरिकांकडे या बाबत काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे. श्रीवर्धन शहर व परिसर हे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक येत असतात. त्यामुळे ते गुटखा सोबत घेऊन येत असल्याची दाट शक्यता आहे.

उमेश पाटील,
पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन

Exit mobile version