उरणमध्ये गुटखा विक्री जोमात; अन्न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष

| उरण | वार्ताहर |
राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही उरण तालुक्यात गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप येथील जनता करीत आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे; परंतु येथे राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. बाहेरून रात्री-अपरात्री येणार्‍या गाड्यांतून गुटखा उरणमध्ये पोहोच होतो, असे बोलले जाते.


गुटख्याच्या पुड्यांच्या माळा पोत्यात खचाखच भरलेल्या असतात. रातोरात गुटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी-चारचाकीतून घेऊन जातात. तसेच उरणमधील काही ठिकाणी याचा साठा करून ठेवला जातो. हाच साठा काही दिवस परिसरातील गावोगावच्या विक्रेत्याकडे मागणीनुसार पोहोच केला जातो, असेदेखील सांगण्यात येते. उरणमधील रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या पुड्या दिसून येतात. तर, सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे कानेकोपरे गुटखा खाणार्‍यांच्या पिचकार्‍यांनी रंगलेले आहेत.

अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, अन्न प्रशासनाकडून काही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली होती. परंतु, तेच विक्रेते गुटखा विक्री करताना दिसत आहेत. पोलिसांकडूनही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न प्रशासन आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version