अलिबागपासून कर्जतपर्यंत गुटखा विक्रीला उत

कारवाई केलेला गुटख्याचा सुत्रधार पुन्हा सक्रीय; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गुटखा विक्रीला बंदी असतानादेखील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून कर्जतपर्यंत बेकायदेशीररित्या गुटखा विक्री राजरोसपणे सुरु आहे. गुटखा विक्रीचा मुख्य सुत्रधार आझम शेख कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा गुटखा विक्रीसाठी सक्रीय झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात विमल, गोवा सारख्या तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा सुळसुळाट वाढू लागला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे.

गुटखा व अन्य तंबाखू जन्य पदार्थाच्या आहारी गेल्याने कॅन्सर सारखे आजार जिल्ह्यात वाढू लागू लागले आहेत. तपासणीमध्ये एक ते दोन कॅन्सरचे रुग्ण सापडत असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.त्यामध्ये तोंडाचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. विमल व गोवा सारखे तंबाखू जन्य पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याने सरकारने गुटखा विक्री, वाहतूकीला बंदी घातली. परंतू नवी मुंबई येथून रायगड जिल्ह्यात आझम शेख नामक व्यक्तीकडून छुप्या पध्दतीने गुटखा विक्री सुरु झाली. खालापूर पोलीसांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 20 लाख पेक्षा अधिक किंमतीचा गुटखा जप्त करून यातील मुख्य सुत्रधार आझम शेख उर्फ राजू शेठ याला अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात काही प्रमाणात छुप्या गुटखा विक्रीला ब्रेक लागला होता. परंतू आझम शेख कारागृहातून सुटून आल्यावर त्याने पुन्हा त्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरु ठेवण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग शहर, कार्लेखिंड, पेण, नागोठणे, पाली ,खालापूर, कर्जत अशा अनेक भागांमध्ये गुटखा विक्रीचा सुळसुळाट वाढू लागला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचा अंकूश राहिल का,अन्न व औषध प्रशासन या बेकायदेशीर गुटखा विक्रीला रोखण्यास यशस्वी ठरेल का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version