| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने जुलै महिन्यात भिवंडी आणि कामोठे परिसरातून अवैध विक्रीसाठी आणलेला तब्बल 2 कोटी 72 लाख रुपये किमतीचा गुटखा न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी खारघर डोंगरात जाळून नष्ट केला.
नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाला कामोठे येथे एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पथकाने तात्काळ कारवाई करत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. या चालकाने हा गुटखा भिवंडी येथून मिळाल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारावर, पथकाने भिवंडी येथे धाड टाकली. यावेळी अवैध विक्रीसाठी आणलेला गुटखा चार कंटेनरमध्ये आढळून आला. पोलिसांनी हा सर्व गुटखा, टेम्पो आणि चार कंटेनर ताब्यात घेतले आणि या प्रकरणी पाच संशयितांना अटक केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार, हा जप्त केलेला मोठा साठा खारघर ओवे कॅम्प येथील तलावाशेजारी मोठा खड्डा खोदून जाळून नष्ट करण्यात आला. या वेळी कोणतीही पर्यावरणीय हानी होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक सूरज गोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी अंकुश म्हात्रे, कृष्णा धोंडे, रमेश तायडे, परमेश्वर भाबड, तुकाराम सोनवलकर हे उपस्थित होते.







