महाडमध्ये लाखोंचा गुटखा जप्त

अवैध गुटखा व्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई; एकास अटक

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरूच ठेवली असून, अवैध गुटखा विक्रीचा पर्दाफाश करत 19 लाख 23 हजार 296 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत समीर वसंत पारेख (52) रा. सरेकरआळी, महाड यास अटक करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आणि महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक व गुन्हे शोध पथकाने आरोपी समीर पारेख याच्या ताब्यातील महिंद्रा मॅक्सिमो टेम्पो तसेच महाड-मध्यमा ट्राय सिटी बिल्डिंग, डोंगडी पुल येथील गाळ्याची तपासणी केली. यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शासनाने विक्री, उत्पादन व साठवणुकीवर बंदी घातलेल्या या पदार्थांचा साठा करून त्यांची विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक, पोलीस हवालदार भोईर, पोलीस शिपाई कांदे, विन्हेरकर व आंधळे सहभागी झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक करीत आहेत. महाड शहरातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी यापुढेही कठोर कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Exit mobile version