शेकापक्षाच्या हळदीकुंकू समारंभाला उत्स्फुर्त सहभाग

हजारो महिलांनी लुटले सौभाग्याचे वाण
अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी जिंकली रामराजकरांची मने
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रामराज विभागातील महिलांचा सन्मान करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चला हवा येऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे, शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रामराज बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला चिंचोटी, रामराज, बोरघर, सुडकोली या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिला भगिनींनी उत्स्फुर्त गर्दी करीत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्याहस्ते सौभाग्याचे वाण लुटले.

शेकापक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसर लाल बावटेमय झाला होता. लाल बावटयाचा जयजयकार करीत या महिला शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांना अभिवादन करीत होत्या, त्यामुळे संपूर्ण वातावरण भारुन गेले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना शेकापक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी श्रेया बुगडे यांच्या अभिनयाचा आवर्जून कौतुक करीत तिचे कार्यक्रम आपल्या आवडत असते. श्रेया आपले काम झोकुन देत करत असते, कुठेही आळसपणा तसेच तोचतोचपणा नसल्याचे सांगत कौतुक केले. महिलांचे चांगले संघटन उभे केल्याबद्दल महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांना देखील धन्यवाद दिले. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे कसब संपूर्ण जिल्ह्यात दाखविल्याबद्दल अभिनंदन देखील जयंत पाटील यांनी केले. शेकापक्षाचा चांगला वारसा पुढे सुरु असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

बच्चूभाई मुकादम यांचे कार्य शेकापक्षाची चौथी पिढी लक्षात ठेवते याचा आनंद व्यक्त केला. प्रचंड संख्येने उपस्थित असल्याबाबत महिला कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक करीत मनात असलेली वेगळी चिड असून पुढल्या काळात त्यातून आपल्याला अपेक्षित कार्य करायचे असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
तर चित्रलेखा पाटील यांनी आपल्या भाषणात या विभागातील महिलांच्या ताकदीवर आपण यशस्वीपणे कार्य करीत असल्याने त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम राबविण्याच्या हेतून हा हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना आपल्या दैनंदिन कामातून विरंगूळा मिळावा या हेतूनेच अभिनेत्री श्रेया बुगडे यांना कार्यकर्त्यांमध्ये घेऊन आल्याचेही त्या म्हणाल्या. आलेल्या अनेक संकटांवर या विभागातील महिलांनी एकजूटी मात केली असल्याने त्यांच्या दुःखात शेकापक्ष म्हणून आपण सोबत होतो. तरीही त्यांना आनंद वाटण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी ताजपूरमध्ये देवीचे मंदिर उभारले आणि आज हळदीकुंकू समारंभातून पुन्हा एकदा आनंदाच्या क्षणी वाण लुटण्यासाठी मोठया संख्येने आलेल्या महिला कार्यकर्त्यांना चित्रलेखा पाटील यांनी लाल सलाम केला. तर अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी आपल्या मनोगतातून रामराजकरांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, हे माझेच गाव आहे. मी अलिबागकर होत आपल्या लोकांमध्ये राहण्याची तयारी केल्याची गोष्ट त्यांनी सांगितली. चला हवा येऊ द्या सारख्या कॉमेडीच्या कार्यक्रमाला 8 वर्षे पुर्ण होणे म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यामागे झी टिव्ही चॅनेल आणि डॉ निलेश साबळे यांचे यशस्वी नेतृत्व लाभल्याने हे शक्य झाले.

प्रगतीसाठी आपल्याला एका चांगल्या धडाडीच्या नेतृत्वाची गरज असते. आणि आपल्या सर्वांना आ.जयंत पाटील यांच्या रुपातून असे सक्षम नेतृत्व लाभले आहे. असे सांगत सर्वांनी आ. जयंत पाटील यांची साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी तालुका चिटणीस अनिल पाटील, शेकापक्ष पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यालयीन चिटणीस सौम्या कोरडे, अरुण भगत, जिल्हा परिषद सदस्य मधू ढेबे, मधूकर धुमाळ, नौशाद बेबन, पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माजी सभापती आरती पेडवी, माजी उपसभापती प्रतिभा पाटील, देवयानी पाटील, सोहर वागळे, सरपंच हिराचंक काष्ठे, उपसरंपच गणेश धुमाळ, सदस्य क्षमा झावरे, किर्ती कनोजे, नम्रता सावंत, ताराबाई वाघमारे, अक्षता पाटील, किसन जाधव, तुकाराम दरोडा आदीनीं परिश्रम घेतले.

Exit mobile version