रांगोळी स्पर्धा आणि जनजागृतीपर मार्गदर्शनाने रंगला कार्यक्रम
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नवघर शाळेमध्ये ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा परिसरात उत्साहाचे आणि प्रबोधनाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे माता-पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली रांगोळी स्पर्धा. स्त्री शिक्षणाचा संदेश आणि सामाजिक विषयांवर आधारित सुंदर रांगोळ्यांनी शाळेचे अंगण सजले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत लेक वाचवा, लेक शिकवा हा संदेश घराघरात पोहोचवला. या प्रसंगी नवघर येथील ज्येष्ठ नागरिक जोशी काकू यांनी उपस्थित माता आणि मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलींचे योग्य संगोपन या विषयांवर प्रकाश टाकला. मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे हीच काळाची गरज आहे, असे विचार त्यांनी मांडले. परंपरेचा वारसा जपत शाळेतील सर्व महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी नटून-थटून या सोहळ्यात सहभाग घेतला. एकमेकींना हळदी-कुंकू लावून आणि वाण वाटून सण साजरा करण्यात आला. केवळ धार्मिक विधी म्हणून नव्हे, तर मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एकत्र येण्याचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले.







