नाट्यगृह बांधकाम रखडले, रसिकांची निराशा
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावसह जवळपासच्या तालुक्यातील नाट्यरसिकांत सांस्कृतिक चळवळ रुजावी या साठी गेली अनेक वर्षापासून माणगावात सर्व सोयींनीयुक्त असे भव्य नाट्यगृह उभारावे अशी रसिक प्रेमींची मागणी होती. त्या मागणीचा विचार करून शासनांनी माणगावात नाट्यगृह मंजूर केले. या नाट्यगृहाचे बांधकाम सुरु झाले असून गेली अनेक दिवस हे काम संथ गतीने सुरु असून सध्या हे काम थांबले आहे. या नाट्यगृह बांधकामासाठी पुरेसा निधी शासनाकडून मिळत नसल्याने हे काम जमीन सपाटीपर्यंत आले आहे. त्यामुळे रसिकांची निराशा होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे शासनांच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून 4 कोटी रूपये खर्चाचे नाट्यगृह बांधण्यास मंजुरी मिळाली होती. त्याला तब्बल दोन वर्ष लोटले. या नाट्यगृहाची प्रेक्षक बसण्याची क्षमता 500 आहे. हे कमी क्षमतेचे नाट्यगृह माणगावात उभारल्यास या ठिकाणी दर्जेदार नाटकाचा खर्च उभारु शकेलच असे नाही. पर्यायाने दर्जेदार नाटके आणणे किंवा सादर करणे आयोजकांना परवडणारे नाही. त्यामुळे नाट्य रसिकांच्या तोंडला शासनाने पानेच पुसली आहेत. या नाट्यगृह उभारणीचे काम सध्या सुरु आहे. हे काम एका ठेकेदारामार्फत केले जात असून सद्यस्थितीत हे काम 15 ते 20 टक्के झाले असून ते बेसमेंटपर्यंत झाले आहे. संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी झालेल्या कामाचे मूल्यांकन करून निधी शासनाने अदा केल्यास हे काम जलदगतीने होईल, अशी चर्चा नागरीकातून बोलताना व्यक्त होत आहे.
या नाट्यगृहाची आसन क्षमता कमी असल्याने आयोजकांना दर्जेदार, नावाजलेली नाटके आणणे परवडणारे नाही. त्यामुळे प्रेक्षकांना आवडीची, गाजलेली व दर्जेदार नाटके बघता येणार नाहीत. सध्या पनवेल, रोहा, महाड येथे नाट्यगृह आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, येथे नाट्यगृह आहेत. माणगावचे नाट्यगृह 500 बैठक आसन क्षमतेचे असल्याने तिकिटाचा दर आयोजकांना पर्यायानी वाढवावा लागणार असून हा खर्च उभा करण्यासाठी रसिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या नाट्यगृहाची आसन क्षमता वाढवून 700 किंवा 1000 केल्यास या नाट्यगृहात लहान-मोठे कार्यक्रम व दर्जेदार नाटक ठेवणे सोयीस्कर होईल.





