हमजा सलीमने रचला विश्वविक्रम

43 चेंडूंत ठोकल्या 193 धावा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र, आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन क्रिकेटमध्ये एका खेळाडूने टी-10 मध्ये 193 धावा अक्षरशः कुटल्या. हमजा सलीम डार या फलंदाजाने केवळ 43 चेंडूंत 193 धावा केल्या. टी-10 क्रिकेटमधील पहिले द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकले. मात्र, त्याने सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रचला आहे.

युरोपियन क्रिकेटमधील हा टी-10 सामना कॅटलुन्या जॅग्वार आणि सोहल हॉस्पिटॅलेट यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना जॅग्वार संघाने निर्धारित 10 षटकांत एकही गडी न गमावता 257 धावा केल्या. यादरम्यान फलंदाज हमजा सलीम डार याने 43 चेंडूंत 193 धावांची विक्रमी खेळी केली. यादरम्यान त्याने 22 गगनचुंबी षटकार आणि 14 चौकार लगावले. क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. याआधी एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम लुईस डू प्लॉयच्या नावावर होता. त्याने यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी हंगेरीसाठी 40 चेंडूंत 163 धावांची नाबाद खेळी खेळली होती. सोहल हॉस्पिटलटेट गोलंदाज मुहम्मद वारिसने दोन षटकांत सर्वाधिक 73 धावा केल्या. वारिसने एका षटकात 6 षटकारही मारले. त्याने एकूण 43 धावा केल्या. सोहल हॉस्पिटलच्या गोलंदाजीदरम्यान एकच षटक असे होते, ज्यामध्ये 20 पेक्षा कमी धावा झाल्या होत्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कॅटालुन्या जगुआरने डारच्या या वादळी फलंदाजीच्या जोरावर फक्त 10 षटकात एकही गडी न गमावता 257 धावांचा डोंगर उभा केला. डारच्या सोबत फलंदाजीला आलेल्या यासिर अलीने फक्त 19 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. उत्तरादाखल हॉस्पिटलेट संघाला 10 षटकात 8 बाद 104 धावा करता आल्या. त्यांच्याकडून राजा शहजादने 10 चेंडूत सर्वाधिक 25 धावा केल्या. याशिवाय कमर शहजादने 13 चेंडूत 22 आणि आणिर सिद्दीकीने 9 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. जग्वार संघाने 153 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

Exit mobile version