| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात रात्री उशिरा पर्यंत चायनीजसह वडापाव, पावभाजी आणि इतर खाद्य पदार्थांच्या गाड्या सुरु राहत असल्याने त्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यपीसह गुन्हेगारी वृत्तीच्या माणसांचा वावर दिसून येतो यातूनच गुन्हे होत असून अश्या हातगाड्यांवर पोलीस व पनवेल महानगरपॅलिएकचे अतिक्रमण विभाग कारवाई करताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. परिसरातील मोकळे भूखंड, आडोशाच्या जागा, महामार्ग, पेट्रोल पंप परिसर चायनीज सेंटरला आंदण दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा अनधिकृत व्यवसायांवर महापालिकेकडून कारवाईत अर्थपूर्ण हात आखडता घेतला जात असल्याने पोलिसही हात धुवून घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. तर त्याठिकाणी उघडपणे दारूची विक्री, मद्यपान होत असतानाही उत्पादनशुल्क विभागाकडून टेबलनिहाय हिसाब मोजला जात असल्याचाही आरोप होत आहे. मोकळे भूखंड, गावठाणातल्या जागा, नर्सरी, अनधिकृतपणे अडकवलेल्या जागा, यामध्ये अवैध चायनीज सेंटरसह इतर खाद्य पदार्थांचे व्यवसाय चालवले जात आहेत. प्रत्येक शहरामध्ये असे चायनिज सेंटर असून काही दिवसभर चालवले जातात तर काही ठिकाणी फक्त रात्रीचा खेळ सुरू होतो. तेथे मद्यविक्री, मद्यपान चालत असतानाही उत्पादनशुल्क विभाग व पोलिस यांच्या नजरेतून अशी ठिकाणे सुटत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. चायनीज सेंटरच्या अतिक्रमणांना पालिका अधिकाऱ्यांकडून बेधडक अभय मिळत आहे.
आजवर अशा अनेक गंभीर घटना चायनीज सेंटरच्या ठिकाणी घडलेल्या आहेत. परंतु केवळ पालिकेच्या उदासीनतेमुळे परिसरात अवैध चायनीज सेंटरसह इतर गाडयांना अभय मिळताना दिसत आहे. परिणामी, तिथे लागणाऱ्या टेबलचा हिसाब जोडून उत्पादनशुल्क व पोलिसदेखील हात धुवून घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. याचा परिणाम शासनाचे सर्व नियम मान्य करून रीतसर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिक, हॉटेल चालकांवर होत असल्याने त्यांनी सुद्धा अश्या प्रकारे बेकायदेशीर रित्या लागणाऱ्या खाण्याच्या हातगाड्यांवर स्थानिक पोलीस आणि महापालिइकने कारवाई करावी अशी मागणी करीत आहेत.