। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या भारतात आयपीएलचा थरार रंगला आहे, परंतु सर्वांचे लक्ष जूनमध्ये होणार्या टी-20 विश्वचषकावर आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. या आयपीएल हंगामात तो फारसा फॉर्ममध्ये दिसत नाही. ना तो फलंदाजीत चमत्कार करत आहे ना गोलंदाजीत.
आयपीएल सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने सांगितले होते की, रोहित शर्मा कर्णधार असणार आहे आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. पण हार्दिकची आयपीएलमधील कामगिरी पाहता उपकर्णधारपद सोडले तर त्याला संघात स्थान मिळणेही कठीण झाले आहे. भारताला मुंबईचा एक अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, जो हार्दिकपेक्षाही भारी आहे आणि तो या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ निवडकर्ता यांच्यात संघाबाबत चर्चा झाली.
शिवम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. गरज पडल्यास तो गोलंदाजीनेही संघाला साथ देऊ शकतो. अशा परिस्थितीत शिवमने या शर्यतीत हार्दिक पांड्याला मागे टाकल्याचे मानले जात आहे. पांड्याने उर्वरित सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केल्यास त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, अन्यथा त्याच्या जागी शिवम दुबेला खेळवले जाऊ शकते.