| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रामनवमीनंतर रायगड जिल्ह्यात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून, भाविक हा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी (दि.2) हनुमान उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव जिल्ह्यामध्ये 606 ठिकाणी साजरा होणार आहे. या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रायगड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.
जिल्ह्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला. या उत्सवानंतर आता जिल्ह्यामध्ये श्री हनुमान उत्सवाचे वेध आहेत. त्यानिमित्ताने ग्रामीण व शहरी भागातील ग्रामस्थ मंडळांनी तयारी जोमाने केली आहे. जिल्ह्यात श्री हनुमानांची 606 मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे ऐतिहासिक आहेत. जिल्ह्यामध्ये गुरूवारी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त एकूण 308 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. 27 ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत. विधीवत पुजेनंतर आरती झाल्यानंतर सकाळपासून भाविकांसाठी मंदिरे खुली होणार आहेत. तसेच, गावागावांत संध्याकाळपर्यंत भजनांचा कार्यक्रम असणार आहे. रात्री आठ वाजल्यानंतर मिरवणूक काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकींसोबत भजन, खालूबाजा, बेंजो आदी वाद्यांचा जल्लोष पहावयास मिळणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयामध्ये 842 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये 83 पोलीस अधिकारी, 689 पोलीस अंमलदार, 70 वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच 3 आरसीपी दल, 1 अतिशिघ्र कृती दल, 5 स्ट्रायकींग फोर्स ही सुरक्षा यंत्रणा तैनात असणार आहे.
जिल्ह्यात उद्या हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष
