। मुरूड । वार्ताहर ।
अपेक्षेप्रमाणे आणि बागायतदारांकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदा मुरूडच्या मार्केटमध्ये मे, महिन्यात हापूस आंबे विक्रीस आले. सुरवातीला डझनाचा भाव 1000 ते 900 रुपये होता जो सर्व सामान्यांना परवडणारा नव्हता; मात्र गेल्या शनिवार रविवार पासून मुरूड येथील मुख्य मार्केटमध्ये हापूस आंबे मोठया प्रमाणात विक्रीस आल्याने भाव घसरला असून भाव प्रति डझन 300 ते 400 रुपयांवर आला आहे. तर कच्चे हापूस आंबे 200 रूपये डझनाने मिळू लागले आहेत. अवकाळी पाऊस पडण्यापूर्वी हा आंबा विक्रीस आल्याने आणि भाव खाली आल्याने आंबा हातोहात विक्री होताना दिसत आहे.
मार्केट मध्ये सकाळी खारआंबोली, नागशेत, शिघ्रे, मजगाव, विहुर, तेलवडे, जोसरांजन, नांदले, वाळवटी, उसरोली, सायगाव, येथून महिला 2 डझनाचे खोके पॅक करून थेट विक्रीस आणीत आहेत. पायरी आंब्याचा देखील काही प्रमाणात समावेश आहे राजपुरी येथील आंबा व्यापारी इब्राहीम एद्रोस यांनी देखील मुंबईत आंबे पाठविण्यास मे महिन्यात सुरुवात केली. त्यांच्या घेतलेल्या बागेत हापूस आंबे उतरविणे अजूनही कित्येक झाडांवरील आंबे उतरविणे बाकी आहे. अशातच अवकाळी पाऊस आला तर आंब्याला मागणी कमी होउन भाव आधिक खाली येऊ शकतात अशी माहिती काही बागायतदारांनी दिली. त्यामुळे कमी काळात कमी आधिक भावाने जलद आंबा विक्रीकडे व्यवसायिकांचा कल दिसून येत आहे.
यंदा पाऊस लवकर येणार असल्याचे हवामान खात्याकडून सूचित करण्यात आले असल्याने तयार झालेला आंबा लवकर उतरविण्यासाठी बागायतदारांची लगबग दिसून येते.आदिवासी महिला देखील आंबा विक्रीस आणताना दिसत आहेत.राजपुरी येथील मोठे आंबा व्यापारी इब्राहिम एद्रोस, यांनी आपल्या खोकरी आंबा सेंटर वरून मुंबईकडे आंबा पाठविण्यास गेल्या आठवड्या पासून सुरुवात केली आहे.अवकाळी किंवा जूनच्या मोसमी पावसाआधी आंबा उतरवून मुंबईत नेल्यास भाव मिळू शकतो.मुंबईत परराज्यातील आंबे विक्रीस आले असून कोकण हापूस आणि कर्नाटक हापूस यांची मोठीच टक्कर आहे ; मात्र कोकण हापूस चवीला स्वादिष्ट असल्याने ग्राहक याच आंब्याला पसंती देताना दिसतात. तोतापुरी आंबे अजूनही मार्केटमध्ये विक्रीस आलेले नाहीत.
मुरुडमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली; पर्यटकांचा आंब्यावर ताव
