मुरूड मार्केटमध्ये अद्याप हापूसचा मागमूस नाही
। मुरूड-जंजिरा । प्रकाश सद्रे ।
अवकाळी पाऊस, वादळे, वाढलेले प्रदूषण याचा मोठा फटका यंदा आंबा पिकाला बसला असून, हापूस आंबा पीक मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा परिसरात उशिराने येणार आहे. आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने मोठे नुकसान सहन करावे लागेल, अशी माहिती मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील होलसेल आंबा बागायतदार व्यापारी इब्राहिम अब्दुला एद्रोस यांनी दिली.
राजपुरी खोकरी येथील 86 वर्षीय इब्राहिम एद्रोस हे आंबा निर्यातदार म्हणून 50 वर्षांपासून प्रसिद्ध असून, मुंबई, वाशी व रायगडात त्यांच्याकडून उत्कृष्ट प्रतीचा दरवर्षी दहा हजार पेटी हापूस आंबा पाठविला जातो.खोकरी, राजपुरी, खारआंबोली या गावातून त्यांची स्वतःची चार ते पाच एकर जमीन असून, यावर 100 आंबा झाडे आहेत. याशिवाय तुरुंबाडी (श्रीवर्धन), पाबरे (म्हसळा), सायगाव (मुरूड) आदी त्यांच्या बागायती असून, आंबा उत्पादन घेतले जाते. या कामात त्यांचा मुलगा इकबाल एद्रोस याने अधिक लक्ष घालून आणि खूप मेहनत करून आंबा व्यापार वाढविला आहे. याबरोबरच राजपुरी, मुरूड, रोहा आदी भागात जाऊन आंबा झाडांचे लिलावदेखील पूर्ण क्षमतेने घेत असतात. खोकरी घुमटाच्या बाजूला स्वतःच्या जागेत त्यांचे आंबा पॅकिंग आणि विक्री केली जाते. यासाठी 20 मजूर प्रत्येकी 500/- मजुरीने ठेवलेले असून, त्यांची सर्व व्यवस्था येथेच आम्ही करीत असतो, अशी माहिती इब्राहिम एद्रोस यांनी दिली.
यंदा अवकाळी पाऊस, वादळे, प्रदूषण वाढल्याने आंबा पिकावर या भागात जबरदस्त परिणाम झाला आहे. अनेक झाडांवर अजून कच्च्या कैर्या असून, हे फळ पिकायला मे महिना उजाडेल, अशी माहिती इब्राहिम एद्रोस यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी आम्ही फेब्रुवारी महिन्यात वाशी मार्केटला पेटी पॅक आंबा पाठविला होता. यंदा अद्याप पाठवू शकलो नाही. जी झाडे लिलावात घेतली आहेत, त्यावरदेखील फारसे फळ आले नसल्याने यंदा या व्यापारात मोठे नुकसान होण्याची शक्यता स्पष्ट आहे. काही आंबा फळाला काळी बुरशीदेखील काही झाडांवर दिसून आली.वातावरण बिघडल्याने नारळ, आंबा, शेवगा, जाम, डवरणारी झाडे यांचीदेखील वाढ खुंटलेली आहे. असा प्रकार आपण यापूर्वी कधीही पाहिलेला नाही, अशी माहिती इब्राहिम एद्रोस यांनी दिली.
यामुळे राजपुरी हे गाव मुरुडच्या जवळ असूनही मार्केटला हापूस आंब्याचा मागमूस अद्याप नाही. अजूनही हिरव्या कैर्याच विक्रीस आल्याच्या दिसून येत आहेत. मुरूडकर आणि पर्यटकांना आता आंब्याचे वेध लागले आहेत. मात्र, आंब्याचे उत्पादन निम्यावर येण्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे.
ग्राहक हाच राजा
आम्ही जमीन न विकता आंब्याची कलमे, केळीची झाडे लावून उत्पन्नवाढीसाठी खूप कष्ट घेतले. माझा मुलगा इक्बाल हा दिवसातून तीन वेळा राजपुरी येथून खोकरी येथील बागायतीत जाऊन-येऊन लक्ष देत असतो. घरची मंडळीदेखील जमेल तशी लक्ष ठेवून असतात. आम्ही आतापर्यंत कधीही अवास्तव भाव घेऊन आंब्याचा व्यापार किंवा विक्री केलेली नाही किंवा कुणाला दुखावलेदेखील नाही. ग्राहकांचा नेहमीच दुआ घेतला. त्यामुळे अल्लाहच्या कृपेने आमची भरभराट झाली आहे. फार पूर्वी गरिबीमुळे आपण मुरूड तालुक्यातील मिठागर, सावली, उसडी, टोकेखार जमृतखार आदी गावांतून गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट विकण्याचा व्यवसाय केल्याचे इब्राहिम एद्रोस यांनी सांगितले. मी आणि मुलगा इक्बाल उत्तम प्रतीचा आंबा निर्यातीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. ग्राहकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी नेहमीच घेतो.







