। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्याचे नियोजन करण्यासोबत रायगड जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हात 25 जुलैपासून हर घर जल उत्सव ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीम अंतर्गत 12 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, ग्रामसेवक यांच्यासोबत ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून बुधवारी (दि.3) संवाद साधला.
हर घर जल उत्सव अंतर्गत 100 टक्के वैयक्तिक व संस्थात्मक नळ जोडणी पूर्ण करणार्या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभांमध्ये हर घर जल गाव घोषित करणे, प्रत्येक नागरिकाला 55 लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करणे, यासह इतर बाबींचा समावेश आहे. विविध उपक्रम राबवून हर घर जल उत्सव ही विशेष मोहीम यशस्वी करणेबाबत बैठकीत सुचना देण्यात आल्या.
या ऑनलाइन बैठकीत घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावर करण्यात येणार्या उपाययोजना, अमृत सरोवर योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे यांचा आढावा घेण्यात आला.
या ऑनलाइन बैठकीला सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सल्लागार उपस्थित होते.
उत्सव दृष्टिक्षेप
गाव हर घर जल घोषित करण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करावे. 100 टक्के कुटुंबांना नळ जोडणी, 55 लिटर प्रती दिन शुद्ध पाणी मिळत असलेबाबत ग्रामसभेत नागरिकांच्या अभिप्रायांचे व्हिडिओ ग्रामसभेत घेण्यात यावेत. प्रत्येक कुटुंबाना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रति दिन शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा होत आहे अशी गावे हर घर जल म्हणून घोषित करावीत. वैयक्तिक व संस्थात्मक स्तरावर शंभर टक्के नळ जोडणी झालेल्या ग्रामपंचायतींनी आपली ग्रामपंचायत हर घर जल घोषित करावी. ग्रामपंचायत मध्ये ऋढघ कीटद्वारे पाणी नमुने तपासण्याची मोहीम राबवावी. हर घर जल घोषित ग्रामपंचायतींनी रांगोळी, गाव फेरी, पथनाट्य आदीद्वारे उत्सव, समारंभ साजरा करावा. उत्सवात ग्रामपंचायत आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा आदींमधील सर्व लाभधारकांनी सहभागी व्हावे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करून जल प्रतिज्ञा घेण्यात यावी. हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ शाळा अंगणवाडी इत्यादी सर्व घटकांना सहभागी करुन घ्यावे.