हुंड्यासाठी विवाहित तरुणीचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

| महाड | प्रतिनिधी |

माहेरहून हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करीत तिला नदीमध्ये ढकलून ठार मारण्याची धमकी देणार्‍या तिच्या पतिवर तसेच सासू व सासऱ्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील केंबुर्ली या ठिकाणी ही घटना घडली असून पीडित महिला ही शिक्षिका आहे.

याबाबत शिक्षिका अक्सा मुईज घोले (वय 25, रा. केंबुर्ली) यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अक्सा यांचा विवाह मुईज घोले यांच्याजवळ 4 डिसेंबर 2021 ला झाला होता. तेव्हापासून 30 जानेवारी 2023 पर्यंत अक्सा यांचा पती, सासू व सासरा यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. लग्नामध्ये दागिने, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन घेण्याकरता माहेरून हुंडा दिला गेला नाही म्हणून त्यांचा शारीरिक छळ केला जात होता. याशिवाय त्यांचा पती मुईज याने तलाक तलाक तलाक असे तीन वेळा करून आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची धमकीही दिली. तसेच अक्सा यांना मोटारसायकल वर बसवून पुलावर नेले व नदीमध्ये ढकलून ठार मारण्याची धमकी देखील दिली. हा सर्व प्रकार अक्सा यानी आपल्या तक्रारीत नमूद केला आहे.

पती व सासू-सासर्यांच्या जाचाला कंटाळून अखेर अक्सा यांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार 4 फेब्रुवारीला महाड शहर पोलीस ठाण्यात मुईज फारुख घोले, फारुख अब्दुल रहमान घोले व खादीजा फारूक घोले या तिघां विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे करत आहेत.

Exit mobile version