अकमलच्या वादग्रस्त विधानावर हरभजन सिंगचे प्रत्युत्तर

कामरान अकमलने मागितली माफी

| मुंबई | वृत्तसंस्था |

पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज कामरान अकमल याने अर्शदीप सिंह याच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावरुन भारताच्या माजी फिरकीपटू हरभजन सिंहने चांगलाच समाचार घेतला आहे.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय संघान आयसीसी टी-20 विश्वचषक 2024च्या 19 व्या सामन्यात पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंहने घेतली. अर्शदीप गोलंदाजी करत असतानाच पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने अर्शदीप आणि शीख समुदाताबद्दल वादग्रस्त टीका केली. त्यात तो म्हणाला, ‘अर्शदीप सिंह याला शेवटची ओव्हर टाकायची आहे, तसा तो रंगात दिसत नाही, आता 12 वाजले आहेत.’ यानंतर कामरान हसतो. कामरानसह असलेले इतर म्हणतात, ‘कुणा शिखांना 12 वाजता ओव्हर द्यायला नको.’ हरभजनने या मुद्दयावरुन संताप व्यक्त करत कामरानचा चांगलाच समाचार घेतला आहे.

हरभजनने चांगलेच सुनावले
भारतीय माजी फिरकीपटू हरभजन सिंह यांनी कामरानला चांगलेच सुनावले, 'तोंड उघड्याच्या आधी शिखांचा इतिहास जाणून घ्या, आम्हीच शिखांनी तुमच्या आई-बहिणींचा अपहरणकर्त्यांकडून बचाव केला आहे, तेव्हाही 12 वाजले होते, तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे कामरान, थोडी कृतज्ञता दाखव.'
कामरान अकमलने मागितली माफी
कामरानने माफी मागत ट्विट केले आहे की, 'मी केलेल्या टिप्पणीवर मला मनापासून खेद वाटते आहे, त्यामुळे मी हरभजन सिंह आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो, माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते, जगभरातील शीख लोकांबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, मला खरंच माफ करा.'
Exit mobile version