मुंबईच्या विजयाचा सूर्य तळपला

जसप्रीत बुमराचा पाच विकेटचा दणका

। मुंबई । वृत्तसंस्था ।

जसप्रीत बुमरा (5/21) याने भेदक गोलंदाजी केल्यानंतर इशान किशन (69 धावा) व सूर्यकुमार यादव (52 धावा) यांनी झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सात विकेट व 27 चेंडू राखून धुव्वा उडवला. मुंबईने सलग दुसर्‍या विजयाला गवसणी घातली. बंगळूरचा हा पाचवा पराभव ठरला. बंगळूरकडून मुंबईसमोर 197 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. इशान किशन व रोहित शर्मा या सलामी जोडीने नवव्या षटकात 101 धावा फटकावत इरादे स्पष्ट केले. इशानच्या झंझावातात बंगळूरच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. त्याने 34 चेंडूंमध्ये सात चौकार व पाच षटकारांसह 69 धावांची खेळी केली. आकाशदीपच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. दरम्यान, याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या; पण जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर तो तीन धावांवरच इशान किशनकरवी झेलबाद झाला.

आकाश मधवालने विल जॅक्सला आठ धावांवर बाद करीत बंगळूरला दुसरा धक्का दिला. यानंतर मात्र फाफ ड्युप्लेसी व रजत पाटीदार या जोडीने 82 धावांची भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न केला. जेराल्ड कोएत्झी याने पाटीदारला किशनकरवी झेलबाद केले. या लढतीत पाटीदारने 26 चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांसह 50 धावांची खेळी केली. अखेर तो फॉर्ममध्ये आला. फिरकी गोलंदाज श्रेयस गोपालने ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर पायचीत बाद करीत मोठा अडसर दूर केला; पण ड्युप्लेसी व दिनेश कार्तिक यांनी बंगळूरचा डाव सावरला. दोघांनी अप्रतिम फलंदाजी केली. ड्युप्लेसीने 40 चेंडूंमध्ये 61 धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. बुमराने त्याला बाद केले.

कार्तिक व बुमरा चमकले
बंगळूर फलंदाजी करीत असताना अखेरच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिक व जसप्रीत बुमरा चमकले. कार्तिकने 23 चेंडूंमध्ये नाबाद 53 धावांची खेळी साकारताना पाच चौकार व चार षटकारांची आतषबाजी केली. याचदरम्यान बुमराने महिपाल लोमरोर, सौरव चौहान व विजयकुमार वैशाखला बाद करीत ठसा उमटवला. बंगळूरने 196 धावांपर्यंत मजल मारली.
सूर्याचा झंझावात
इशान बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट खेळाडू सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला. त्याने अवघ्या 19 चेंडूंमध्ये पाच चौकार व चार षटकारांसह 52 धावांची धडाकेबाज खेळी केली. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर रोहित 38 धावांवर बाद झाला. विजयकुमार वैशाखने सूर्यकुमारला बाद केले. हार्दिक पंड्या (नाबाद 21 धावा) व तिलक वर्मा (नाबाद 16 धावा) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Exit mobile version