हार्दिक पांड्याची कारकीर्द धोक्यात

। मुंबई । प्रतिनिधी ।

श्रीलंका दौर्‍यावर भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवची होत आहे. खरंतर, बीसीसीआयने टी-20 संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले आहे. 2024 च्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा उपकर्णधारही होता. पण श्रीलंका दौर्‍यासाठी तो टी-20 संघात असला तरी त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. टी-20 विश्‍वचषकात चमकदार कामगिरी करूनही हार्दिककडे कर्णधार म्हणून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या पांड्याच्या कर्णधारपदावरही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

यातच आयपीएल 2024 च्या हंगामातून हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. रोहित शर्माला हटवून एमआयने हार्दिकला संघाचा कर्णधार बनवले होते, पण सूर्यकुमार यादवही मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि आता तो टी-20 मध्येही भारतीय संघाचा कर्णधार आहे. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचा सूर्या मोठी ऑफर देऊ शकतो.

श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी टी-20 मध्ये हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्याची पूर्ण अपेक्षा होती, पण तसे काही घडले नाही. अशा स्थितीत भारतीय संघातील त्याच्या स्थानावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होणार आहेत. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीही होणार असून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिकला स्थान मिळालेले नाही. अशा स्थितीत त्याच्या कारकीर्दीवर आता प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

Exit mobile version