मुंबईकडे परतण्यावर शिक्कामोर्तब
| मुंबई | प्रतिनिधी |
गुजरात टायटन्सला आयपीएलचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या आता स्वगृही अर्थात मुंबई संघात डेरेदाखल होणार आहे. रविवारी रात्री यावर शिक्कामोर्तब झालं असलं, तरी अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. 19 डिसेंबरला दुबई येथे खेळाडू लिलावप्रक्रिया पार पडणार असून, त्यापूर्वी 12 डिसेंबरपर्यंत संघांना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा आहे. आता हार्दिक मुंबई संघात परतण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी रविवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिकबाबत बरीच चर्चा सुरू होती. ‘आयपीएल’ पदार्पणापासून सात वर्षे मुंबईकडून खेळलेल्या हार्दिकने गेल्या दोन हंगामात गुजरात संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने 2022च्या हंगामात जेतेपद, तर 2023च्या हंगामात उपविजेतेपद मिळवले होते. मात्र, तो आता मुंबई संघात परतणार आहे. ‘बीसीसीआय’मधील वरिष्ठ अधिकारी आणि ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीतील सदस्याच्या माहितीनुसार, हार्दिक मुंबई संघात परतणार हे निश्चित झाले आहे. मात्र, दोन्ही संघांनी रविवारी सायंकाळी 5 वाजेपूर्वी करारांवर स्वाक्षरी न केल्याने कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
हार्दिकसाठी ग्रीनला सोडलं!
हार्दिकच्या मोबदल्यात गुजरात संघाला 15 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी मुंबईच्या संघाने हार्दिकला खरेदी करता यावे यासाठी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडे पाठवल्याची चर्चा आहे. ग्रीनला मुंबईने गेल्या खेळाडू लिलावात 17.5 कोटी रुपयांत खरेदी केले होते. आता बंगळूरुला इतकीच रक्कम मुंबईला द्यावी लागणार आहे. दरम्यान, मुंबईने जोफ्रा आर्चर, कोलकाता नाइट रायडर्सने शार्दूल ठाकूर, तर बंगळूरुने वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला.