दुखापतीमुळे पंड्या आयपीएलला मुकण्याची शक्यता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या घोटाच्या दुखापतीमुळे आगामी अफगाणिस्तान दौरा आणि आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे आणि मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे जाण्याची शक्यता आहे. रोहितने टी-20 विश्वचषक खेळावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे. पण, कर्णधारपद मिळाले तरच मी खेळेन, अशी अट रोहितने ठेवली होती. सद्यःस्थिती पाहता रोहितकडे दोन्ही संघांचे नेतृत्व जाऊ शकते.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या दुखापतीचा सर्वात मोठा परिणाम त्याच्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर होणार आहे. अलीकडेच आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून घोषणा केली. 15 कोटींचे मानधन व कर्णधारपदाची अट घालून पंड्याने संघात वापसी केल्याचीसुद्धा चर्चा आहे. मुंबई इंडियन्स व रोहित शर्माचे चाहते या पदबदलामुळे नाराज असताना हार्दिकच्या दुखापतीची ही अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, हार्दिक घोट्याच्या दुखापतीतून बरा होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे तो अफगाणिस्तान मालिकेलाच मुकणार नाही तर आयपीएल 2024 च्या हंगामामधूनही बाहेर पडू शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती सांगगिली असून, आतापर्यंत हार्दिकच्या तंदुरुस्तीबद्दल कोणतेही अपडेट नाही आणि आयपीएल संपण्यापूर्वी त्याच्या उपलब्ध असण्याबद्दलसुद्धा एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स दोघांसाठी हा मोठा धक्का असू शकतो.
