। श्रीवर्धन । वार्ताहर ।
दक्षिण काशी हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रावरील पर्यटक विकास अंतर्गत सुलभ शौचालय काही वर्षे बंद व भग्न अवस्थेत असल्यामुळे श्राद्ध, कार्य विधी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तसेच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तीर्थक्षेत्रावर आलेल्या पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागतं आहे. बंद अवस्थेतील सुलभ शौचालयाची दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करणार की हरिहरेश्वर ग्रामपंचायत ह्या वादात सध्या सुलभ शौचालय अडकले आहे.
खासदार सुनील तटकरे 2005 साली पालकमंत्री असतांना त्यांच्या अधिपत्याखाली विकास आराखडा निधी माध्यमातून सुलभ शौचालयाचे भूमिपूजन झाले होते. सुलभ शौचालय ज्या तीर्थक्षेत्र परिसरात उभे करायचे होते त्या ठिकाणी अगोदर पाण्याची उपलब्धता बघणे गरजेचे होते. एकोणीस लाख रूपये खर्च करून उभ्या केल्या गेलेल्या सुलभ शौचालया करिता पाणीपुरवठा हरिहरेश्वर देवस्थान करणार की ग्रामपंचायत? विकास आराखड्या वेळी देवस्थान व ग्रामपंचायतीशी समन्वय साधला गेला नाही ह्या मुळे सुलभ शौचालय कोरडेच राहिले.
सुट्टीच्या दिवशी दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे आल्यावर तीर्थक्षेत्रावर फिरायला जाणारे पर्यटक तसेच पांडवतीर्थ व शुक्लतीर्थ येथे नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राध्द,उत्तरक्रिया असे विधी करावयास आलेले बाहेरगावातील नागरिक यांची सुलभ शौचालया अभावी गैरसोय होताना दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता बंद व दुरावस्था झालेल्या शौचालयाची दुरूस्ती ग्रामपंचायतीनी करावी. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाही, असे सांगण्यात आले.
पर्यटक विकास अंतर्गत सुलभ शौचालय म्हणजे हरिहरेश्वर भकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचा विकास.हरिहरेश्वरच्या विकासात भ्रष्टाचार झाला आहे.शौचालयाचे काम एकोणीस लाख नाही तर नऊ लाखाचे आहे.शौचालयाचे नियोजन ज्या पध्दतीने हवे होते तसे झाले नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं आहे.
– सचिन गुरव, माजी उपसरपंच हरिहरेश्वर