पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
| अलिबाग | प्रतिनिधी |
उमटे धरणातून पुरवठा होणारे पाणी दूषित असून, पाण्यासाठी तीन दिवस वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करण्यास जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभाग उदासीन ठरले आहे. त्यामुळे नागाव, चौल, आक्षी, रेवदंडा येथील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य पाण्यासाठी एकवटले. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी आक्रमक पावित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. मुबलक पाणी कधी देणार, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नागाव, चौल, आक्षी, रेवदंडा ही गावे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. उमटे धरणातून या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी या पाणीप्रश्नाबाबत पुढाकार घेत चारही गावांतील आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व प्रशासक यांना बोलावून त्यांची एकत्रित बैठक शुक्रवारी (दि. 26) घेतली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता टेंबुरकर यांना या बैठकीत पाचारण करण्यात आले. चारही गावांना होणारी पाणीटंचाई, महिलावर्गाची मोठ्या प्रमाणावर होणारी गैरसोय याची जाणीव त्यांना करून दिली.
हर्षदा मयेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत नागरिकांच्या पाण्यासंबंधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. धरणाचे नाही तर टँकरद्वारे तरी नागरिकांना पाणीपुरवठा करून द्यावा. पाणीपुरवठा होत नसेल, तर या कालावधीत पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी भूमिका घेतली. चारही ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी मिळावे यासाठी तात्काळ भूमिका घेण्यात यावी, अशी सक्त ताकीद त्यांना दिली. उमटे धरणातील गाळ कधी काढणार, गावांना पाणी कधी मिळणार, आतापर्यंत गाळ काढण्यासाठी किती पैसे खर्च झाले, आदी प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.
चारही गावांना पाणीपुरवठा झाला नाही, तर येत्या आठ दिवसांनंतर आंदोलन करणार असल्याचा इशारा मयेकर यांनी दिला. यावेळी चारही ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. येत्या मंगळवारी चारही गावांचे सरपंच व सदस्य जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरवर्षी भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील आदी पदाधिकारी, सदस्य व महिला उपस्थित होत्या.