सब स्टेशनचे कामकाज पुर्ण करण्याची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असलेल्या नागावसह परिसरातील अनेक गावांना स्विचींग सब स्टेशनचा आधार मिळणार आहे. मात्र, प्रलंबित कामाबाबत कार्यवाही होत नसल्याने नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर प्रशासकीय कामकाजाबाबत आक्रमक झाल्या. त्यांनी मंगळवारी (दि.17) दुपारी महावितरणचे कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांची भेट घेतली. संथगतीने सुरु असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी शैलेश कुमार यांनी आठवड्याभरात प्रशासकीय प्रक्रीया पुर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक कॉटेज, रिसॉर्ट आहेत. स्थानिकांना यातून रोजगाराचे साधन उपलब्ध होते. वर्षाला लाखो पर्यटक या ठिकाणी येतात. यादरम्यान, नागावमध्ये विजेचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र, पावसाळ्यात तासनतास अंधारात राहण्याची वेळ येते. तसेच, विज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने स्थानिक नागरिकांच्या विजेची उपकरणांचे नुकसान होत आहे. या समस्यांना स्थानिकांना कायमच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीत नागावमध्ये पाचहून अधिक विद्यूत खांब कोसळले होते. त्यादरम्यान पाच ते सहा तास विज पुरवठा खंडीत झाला होता.
नागावमधील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी पुढाकार घेत नागावमध्ये स्विचींग सब स्टेशन उभारण्यासाठी महावितरण कंपनीकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी लागणारी जागा देखील ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. जागा देऊन अनेक महिने उलटून गेले; परंतु, जागा महावितरण कंपनीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली कुर्मगतीने सुरू आहेत. अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून ही जागा करारावर देण्याची प्रक्रीया कधी पुर्ण करणार, असा सवाल हर्षदा मयेकर यांनी उपस्थित केला आहे. तरीदेखील महावितरण विभागाच्या काहीच हालचाली दिसून आल्या नाहीत. अखेर त्यांनी महावितरणच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत मंगळवारी चेंढरे येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली.
यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर नागावमधील विजेच्या प्रश्नाचे गाऱ्हाणे मांडले. स्थानिकांना होणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली. त्याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीतर्फे निवेदनही दिले. तसेच, स्विचींग सब स्टेशनमुळे नागावसह आजूबाजूच्या गावांमधील विजेचा प्रश्नही सुटणार असल्याचे हर्षदा मयेकर यांनी सांगितले. अखेर शैलेश कुमार यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत आठवडाभरातच प्रशासकीय प्रक्रीया पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रियंका काटे, मंगला नागे, अंकीता शेवडे आदींसह महावितरणचे सहाय्यक अभियंता श्रीपाद लेले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकाश तायडे आदी उपस्थित होते.