| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कार्यक्षम व प्रतिभावंत सरपंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांना नुकताच लोणावळा येथे पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ‘ग्रामरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लोणावळा येथील सरीनिटी रिसॉटमध्ये मंगळवारी (दि.29) ‘ग्रामरत्न’ पुरस्काराचे वितरण पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला. नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच या नात्याने अभिनव कल्पना राबवून ग्रामस्थासाठी मयेकर यांनी विविध योजना आणून गावचा विकास साधल्यामुळे नागावचे सरपंच हर्षदा मयेकर यांची ग्रामरत्न सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या कार्यक्रमास पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील, राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, अध्यक्ष जयंत पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण उर्फ माउली ढाणे, राज्य संपर्क प्रमुख सचिन जगताप, राज्य प्रसिध्दी प्रमुख विनायक पाटील आदी मान्यवरासह प्रमुख अतिथी माजी आयएसआ अधिकारी चंद्रकांत दळवी, तसेच आयएसओ लिड ऑडिटर किरण भगत यांची उपस्थिती होती.
हा पुरस्कार नागाव ग्रामपंचायतीतील प्रत्येक ग्रामस्थांला समर्पित असून नागाव ग्रामस्थांचे प्रेम, पांठिबा, आशिर्वाद हेच या यशाचे बळ आहे, तसेच नेहमीच पांठिबा देत असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारीवर्ग यांचे मिळत असलेले सहकार्य तसेच पती निखिल मयेकर यांनी दिलेला आधार व पाठबल याबद्दल आभारी आहे.
सरपंच हर्षदा मयेकर
नागाव ग्रामपंचायत
