| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अद्यापही या जागेबाबत तोडगा न निघाल्यानं महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र आता जिल्ह्याच्या राजकारणात मोठं ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक आहेत. प्रकाश आंबेडकरांनी संधी दिली तर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवू असं त्यांनी म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार मी एकमेव आमदार आहे. जनतेची कामं देखील केलेली आहेत. गेल्यावेळी जलील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता. मात्र आता प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत नाही येत. तर दुसरीकडे खैरेंना देखील फुटीचा मोठा फटका बसू शकतो. शिवसेनेत दोन गट झाले आहेत. मात्र, गेल्या वेळी मला जे मतदान झालं ते मतदान मला फिक्स होणार आहे. मला वाटतं मी सामान्य जनतेसाठी लढलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.