ग्रामीण भागात मासेमारीला सुगीचे दिवस

| रोहा | वार्ताहर |

सध्या सुरू असलेला श्रावण महिना व त्याच्यासोबत चालू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळात पडत असलेल्या कडकडीत उन्हामुळे ग्रामीण भागात मासेमारी करणाऱ्यांसाठी जणू सुगीचे दिवस आले असल्याचे पहावयास मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्याबरोबर सुरुवातीला पावसाचे पाणी ठिकठिकाणी साठल्यामुळे नदीप्रवाहातून आलेले मासे मारण्यासाठीची एकच लगबग ग्रामीण भागात दिसून येत होती.

यंदाच्या मोसमी पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त साधत हळूहळू बरबायला सुरुवात केली. तर जुलैमध्ये मात्र सुरूवातीला मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पुढे बरेच दिवस उलटून गेले तरी मुसळधार स्वरुपात व माश्यांची वल्गन चढेल अशाप्रकारचा समाधानकारक पाऊस न पडल्याने खवय्यांची मात्र निराशाच झाली होती. तर खवय्ये आपली मासे खाण्याची इच्छा भागविण्यासाठी मिळेल ते डबके, नदी, नाले आशा ठिकाणी मिळत आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असून कधीतरी तुरळक पाऊस तर ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. तरूण वर्गाचे एक विरंगुळ्याचे साधन तसेच पोटापाण्याची व्यवस्था म्हणून ग्रामीण युवा वर्गही मासेमारी करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील युवा वर्गाला मात्र मासेमारीसाठी सुगीचे दिवस आले असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version