गणेशोत्सवानिमित्त रंगीत तालीम सुरू; चाकरमानी या कलेपासून दुरावला
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. विशेषत: कोकणात दशावतारी नाटक, शक्तीतुरा, डबलबारी, भजन, कीर्तन आणि जाखडी नृत्य किंवा बाल्या नाच या लोप पावत चाललेल्या लोककलांना पुन्हा सुगीचे दिवस येत आहेत. गणेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात गावा-गावात लोककलांची रंगित तालीम सुरू झाली आहे.

भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव यामध्ये कोकणात या लोककला प्रत्येक गावात सादर होत असतात. सध्या नोकरीनिमित्त शहराकडे आलेला चाकरमानी या कलेपासून दुरावला आहे. म्हणूनच सुधागड तालुक्यातील श्री दत्त गुरु नाच मंडळ यांचा जाखडी नाच 22 वर्ष बंद होता. मात्र, येथील नवतरूण मुलांनी तो परत चालू केला आहे. ही कोकणातील लोककला जिवंत ठेवण्यासाठी हे मंडळ तत्पर आहे. चव्हाणवाडी ग्रामस्थ मंडळाने 22 वर्षांनी जाखडी नृत्याची जमवाजमव सुरू केली आहे. पारंपरिक जाखडी नृत्याचा बाळकूम येथील मरू आईच्या मंदिरात शुभारंभ करण्यात आला. आता दर शनिवार-रविवार या मंडळाची रंगित तालिम येथे सुरू असते. विशेष म्हणजे गावच्या तरुण मंडळींचा या नृत्यात मोठा सहभाग असतो. तर ठाणे आणि भिवंडीमध्ये पुंडलिक मोरे यांच्या माध्यमातून नवीन होतकरू कलाकार मंडळींना तेजस मोरे, सौजस मोरे हे लोकसंगिताचे धडे देत आहेत. गावची कलाकार मंडळी फावल्या वेळात जाखडी नृत्य, शक्ती तुरा, भजन कीर्तन यात दंग होत आहेत. खरंतर लोककला जपणे आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी ही मंडळी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
आपल्या भावी पिढीला ही कला समजावी व त्यांनी देखील हि पारंपरिक कला अधिक समृद्ध करावी यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून मागील 15 वर्षांपासून बाल्या व माळी नाच ही कला जतन करत आहोत. गावातील सर्व ग्रामस्त आम्हाला प्रोत्साहन देवून सहकार्य करतात. पारंपारीक कला टिकावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. गणेशोत्सव निमित्त सराव सुरू केला आहे.
समाधान म्हात्रे
कलाकार, दुरशेत, पेण







