नेत्यांना सुगीचे दिवस

पक्षामध्ये घेण्यासाठी चढाओढ

| उरण | वार्ताहर |

सध्या तालुक्यात थंडीबरोबर पक्ष प्रवेशाची लाट मोठ्या प्रमाणात आल्याने सामान्य नेत्यांनाही महत्त्व आले आहे. राज्यात सरकार स्थापन करताना झालेले निरनिराळे प्रयोग तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट यामुळे सामान्य पदाधिकारी होरपळला जाईल, असे वाटत होते. परंतु, आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

देशातील राजकीय वातावरण कधी बदलेल याचा नेम राहिलेला नाही. जो-तो सत्तेसाठी हपापला आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी करोडोंची मालमत्ता गोळा केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर करून पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. जे पक्षात येत नाही, त्यांचे भ्रष्टाचाराचे बिंग फोडून त्यांना जेलची हवा खाण्याची धमकी दिली जात आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे जेलपेक्षा पक्षात प्रवेश केल्यावर पद व आपली मालमत्ताही सुरक्षित राहात असल्याने गावपुढारी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी पक्ष प्रवेश करीत असल्याच्या बढाया मारताना दिसतात.

पक्ष प्रवेश करणारे राजकीय नेतेमंडळी ही जनतेचा विकास करण्यासाठी नव्हे तर, आपला स्वतःचा विकास करण्यासाठी पक्षप्रवेश करीत आहेत, एवढेही समजून न येईल, इतकी आताची जनता दूधखुळी राहिलेली नाही. त्यामुळे आयुष्यभर एकाच पक्षात निष्ठेने राहिलेले नेतेमंडळी आपली अब्रू उघड्यावर येऊ नये म्हणून निष्ठेला तिलांजली देऊन पक्षाचा त्याग करीत असल्याचा आरोप पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यात आजच्या घडीला नेता कधी कुठल्या पक्षात बेडूक उड्या मारील याचा नेम राहिला नाही. यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकजण निष्ठेच्या गमजा मारून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Exit mobile version