अर्थार्जनाबरोबर कलेला वाव
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
साखरपुडा, हळद, लग्न, जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस, सेवानिवृत्ती किंवा गेट टुगेदर कार्यक्रम हे सर्व प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. आणि या कार्यक्रमांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठी सध्या निवेदक, सूत्रसंचालक गायक व म्युझिक ग्रुप आदींना मागणी वाढताना दिसत आहे. हा नवीन ट्रेंड सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक व होतकरू कलाकारांना प्रचंड मागणी वाढत आहे. या कलाकारांना देखील आपली कला जोपासण्याची व त्यातून अर्थार्जन करण्याची नामी संधी मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात हौशी व प्रतिष्ठा जपणार्या लोकांची संख्या अधिक आहे. लग्न समारंभ असो की सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा बारसे व वाढदिवस अशा कार्यक्रमांमध्ये आता फक्त विद्युत रोषणाई, डेकोरेशन, जेवणावळ्या एवढेच राहिलेले दिसत नाही. तर आलेल्या पाहुण्यांचे चांगले मनोरंजन व्हावे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या प्रतिष्ठित लोकांचा व पाहुण्यांचा उल्लेख व्हावा. शिवाय यांच्या कामाची माहिती मिळावी. कार्यक्रमांमध्ये जिवंतपणा यावा यासाठी निवेदक, सुत्रंचालक आणि गायक म्युझिकल ग्रुप हवाच. त्याशिवाय कार्यक्रमांना रंगत येता नाही.
शोभा व प्रतिष्ठा वाढते अगदी छोट्या-मोठ्या कार्यक्रमात हमखास स्थानिक निवेदक व सूत्रसंचालक बोलावले जातात. हे सूत्रसंचालक आलेल्या पाहुण्यांची नावे घेतात, त्यांचा परिचय देतात. परिणामी आलेल्या पाहुण्यांना समाधान मिळते त्यांचा मानमर्तब वाढतो. गायक म्युझिकल ग्रुप कार्यक्रमात असल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढते आयोजकांना प्रतिष्ठा मिळते.
अगदी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना देखील सूत्रसंचालक व निवेदन लागू लागले आहेत. त्यामुळे मागणी वाढली आहे. सूत्रसंचालक व निवेदकांना चांगले दिवस आले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कार्यक्रमासाठी जातो. आयोजकांनी दिलेले मानधन आनंदाने स्वीकारतो. याबरोबरच कार्यक्रमानुसार स्वतःला अद्ययावत ठेवले आहे. आयोजकांना समाधान व आनंद मिळतो. अनेक जण आगाऊ बुकिंग देखील करून ठेवतात.
संदीप काटकर,
सूत्रसंचालक व निवेदक,
पाली