रोपवाटिका व्यवसायिकांना सुगीचे दिवस

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
कोरोना संकट व लॉकडाऊनमूळे जिल्ह्यातील सर्वच रोपवाटिकेतील रोपांची विक्री थांबली होती. त्या दरम्यान त्यांना करोडोंचे नुकसान देखील सहन करावे लागले. लँडस्केप ची कामे देखील थंडावली होती. मात्र सध्या पावसाळा व विकसकांची सुरू झालेली कामे यामुळे रोपांना मागणी वाढली आहे. यामुळे रोपवाटिका व लँडस्केपिंग व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

जिल्ह्यात जवळपास 100 ते 125 छोट्या मोठ्या रोपवाटिका आहेत. सर्वांचा मिळून वर्षाला कोट्यावधींचा व्यवसाय आहे. मात्र मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात तब्बल 7 ते 8 महिन्यात जिल्ह्यातील असंख्य रोपवाटिकेतील झाडे व रोपे सुकून गेली किंवा प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याने निरुपयोगी झाली. तसेच मागील पावसाचा हंगाम कोरोना नियम व लॉकडाऊनमुळे निघून गेला. अनेक प्रकारची झाडे व रोपे देखील मिळत नव्हती. परिणामी रोपवाटिका धारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत आहेत. रोपवाटिका नव्याने उभ्या राहत आहेत. त्याबरोबरच काही ठिकाणी नव्याने रोपवाटिका सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे देखील झाडांना मागणी वाढली आहे.

पावसाळ्यात लँडस्केपिंगची कामे सुरू झाली आहेत. वृक्षप्रेमी लोक नर्सरीला आवर्जून भेट देतात आणि खरेदी करतात. विविध प्रकारची झाडे उपलब्ध झाली आहेत.

-अमित निंबाळकर, मालक, ग्रीन टच लँडस्केप अँड नर्सरी, पाली

लॉकडाऊनमुळे बाग कामे खोळंबली होती. मात्र आता कामे मिळू लागली आहेत. आणि त्यामुळे शोभिवंत व इतर झाडे आणि लॉन आदी खरेदी करत आहे.

-ऋषी झा, मालक,ध्रुव ऍग्रो व लँडस्केप, सुधागड
Exit mobile version