। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत. माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. आता पुन्हा एकदा ईडीकडून कोल्हापूर येथील मुश्रीफांच्या घरावर छापेमारी सुरु आहे.
कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी कुठं आहे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफांच्या समर्थनार्थ सगळे कार्यकर्ते घराबाहेर जमा झाले आहेत. जनतेसाठी राबणाऱ्या माणसाला त्रास दिला जात असल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफ घरात नसताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले आहे.
एकदाच आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका
तिसऱ्यांदा ईडी कारवाईनंतर आ. हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला भावना अनावर झाल्या. त्या म्हणाल्या की, किती यायचे या ठिकाणी? किती त्रास द्यायचा काही आहे की नाही? रोज उठून ते सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायच तरी काय, यांना सांगा आम्हाला एकदाच गोळ्या घालून जायला सांगा.